नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयात नोटा नव्हे, तर नोटा छपाईचा सदोष कागद नष्ट केला जात असल्याचा दावा नोट प्रेस प्रशासनाने पत्रकार परिषदेत केला. एक हजार रुपयांच्या छापलेल्या सर्वच नोटा सदोष नसून रिझर्व्ह बॅँकेकडे आतापर्यंत १७९ सदोष नोटांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नोटा छपाईकरिता विदेशातून आलेला सदोष कागद नियमानुसार जाळण्यात येत असल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.चलार्थपत्र मुद्रणालयात १ हजार रुपयांच्या ३०० मिलीयन नोटा सदोष छापण्यात आल्या. त्या सदोष नोटा जाळण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते. याबाबत खुलासा करण्यासाठी मजदूर संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोडसे यांनी सांगितले की, एक हजार रुपयांच्या २२५० कोटी (२२५ मिलीयन) नोटा छापून रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीयीकृत बॅँकामार्फत त्या नोटा चलनात आणल्या. चलनात आलेल्या हजारांच्या नोटांमध्ये ‘सिक्युरिटी तार’ नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने मुंबई विभागातील बॅँकांना ‘सिक्युरिटी तार’ नसलेल्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले. तसेच ग्राहकांकडून तशी नोट प्राप्त झाल्यास ती नोट जमा करून ग्राहकांला तितकी रक्कम द्यावी, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅँकेकडे आतापर्यंत १७९ सदोष नोटांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, ५०० पेक्षा जास्त सदोष नोटा नसतील, असेही रिझर्व्ह बॅँकेने स्पष्ट केल्याने गोडसे यांनी सांगितले. होशंगाबाद येथील कागद निर्मिती कारखान्यातून आलेल्या कागदामध्येच काही ठिकाणी ‘सिक्युरिटी तार’ नसल्याने तो सदोष कागद नोटा छपाईसाठी आला. त्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांची चूक नसल्याचे गोडसे यांनी स्पष्ट केले. एका शीटवर ३६ नोटा असतात व एका रिममध्ये ५०० शीट असतात. अशा एकूण ८ रिममधील नोटा एक कामगार तपासतो. सलग ‘सिक्युरिटी तार’ नसती तर सदोष नोटा लक्षात आल्या असत्या. छापलेल्या हजारो-लाखो नोटांमध्ये एखादी ‘सिक्युरिटी तार’ नसलेली सदोष नोट असल्याने ती चूक कामगारांच्या लक्षात आली नाही. यामुळे केंद्राच्या अर्थ खात्याकडून कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नोटा नव्हे, सदोष कागद नष्ट
By admin | Updated: January 21, 2016 22:27 IST