नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून शहरातील हॉटेल्स, उपहारगृहे, हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, मॅटर्निटी होम यांना ना हरकत दाखले देण्यात येतात आणि त्यांचे नूतनीकरणही केले जाते. मात्र, आता आॅगस्ट २०१६ पासून अग्निशमन दलाने दाखल्यांचे नूतनीकरण करणे बंद केले आहे. परंतु, आस्थापनांना फायर आॅडिट करून तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. मनपाच्या अग्निशमन दलाकडून हॉटेल्स, अन्य आस्थापनांना ना हरकत दाखले दिले जातात तसेच हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, आदिंना ना हरकत दाखले देण्याबरोबरच त्यांचे नूतनीकरणही केले जात होते. तथापि, परिपत्रकानुसार व्यवसायासाठी एकदा दिलेल्या ना हरकत दाखल्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक नाही. मात्र अशा आस्थापनाधारकांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना योग्य चालू स्थितीत असल्याबाबत तपासणी करून तसा अहवाल फार्म ‘बी’मध्ये मुख्य अग्निशामक अधिकारी वा नामनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करणे निर्देशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने अग्निशमन विभागाने आॅगस्ट २०१६ पासून दाखल्यांचे नूतनीकरण करणे बंद केले आहे. त्यामुळे फायर आॅडिटचा अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी कळविले आहे.
अग्निशमनकडून ना हरकत दाखल्यांचे नूतनीकरण बंद
By admin | Updated: August 12, 2016 23:10 IST