नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरात शौचालय उभारणीचा कार्यक्रम राबविला परंतु संपूर्ण शहर हगणदारीमुक्तीचे मिशन मात्र अपूर्णच राहिले आहे. प्रामुख्याने, झोपडपट्टी भागात महापालिकेला अद्यापही शौचालय उभारणीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविता आलेला नाही. त्यामुळे उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकलेली नाही.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या अनुदानातून मागील वर्षी सुमारे ७५०० वैयक्तिक शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, सुमारे तिनशेहून अधिक लाभार्थ्यांनी अनुदानाचा पहिला सहा हजाराचा हप्ता घेतला परंतु शौचालय न उभारता मनपाला शेंडी लावली. त्यामुळे या लोकांकडून अद्यापही हप्त्याची रक्कम परत मिळू शकलेली नाही. काही भागात शौचालय उभारणीसाठी पुरेशी जागा नसल्याचे सांगत अनेक लाभार्थ्यांनी अनुदान परत केले होते. त्यामुळे महापालिकेला शौचालय उभारणीचे उद्दिष्टय घटवून ते ६५४६ वर आणावे लागले. दरम्यान, महापालिकेने जानेवारी २०१७ अखेर सहाही विभाग मिळून ६५४६ वैयक्तिक शौचालये व २५ ठिकाणी गट शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महापालिकेकडून हगणदारीमुक्त झालेले प्रभाग जाहीर करण्यात येणार होते. परंतु, अनेक भागात अद्याप उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या कमी झालेली नसल्याने हगणदारीमुक्त शहराचे मिशन अपुरेच राहिले आहे. विशेषत: महापालिकेला झोपडपट्टी भागात वैयक्तिक शौचालय उभारण्यास अथवा गटशौचालयांची उभारणी करताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पंचवटी व पूर्व भागातील झोपडपट्टी परिसरात सुलभ शौचालयांची व्यवस्था असूनही उघड्यावर विधी करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अशा ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने फिरती शौचालयांची व्यवस्था करण्याचा विचार सुरु केला आहे. (प्रतिनिधी)
हगणदारीमुक्तीचे मिशन अपुरेच
By admin | Updated: March 5, 2017 01:26 IST