नाशिक : मोदी.. गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण ! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे, असे चिमटे काढत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविणारे निर्णय घेतले की जनता मतपेटीतून उत्तर दिल्यावाचून राहत नाही. केंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णयही असाच असून, सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे ही नोटबंदी आहे की नसबंदी हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले, नोटाबंदीची घोषणा करताना ‘५० दिन मुझे दे दो’ असं मोदी म्हणाले होते. पन्नास दिवस उलटून गेले तरी जनतेचे हाल संपलेले नाहीत. आता 'त्यांना कोणत्या चौकात उभं करायचं? कोणता आसूड हाती घ्यायचा. चाबूूक घ्यायचा की आसूड ओढायचा? शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. म्हटलं बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात. तुम्हीच ठरवा काय ते ! संसदेजवळच्या बँकेत २४ हजार रुपये काढायला माणूस पाठवला तर १० हजारच मिळाले. तेव्हा आमच्यासारख्या खासदारांची ही गत असेल तर चलनटंचाईने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल हे समजण्यासारखे आहे, असे सांगून पवार म्हणाले, सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या आई-बहिणींच्या गळ्यात किती सोनं आहे याची चौकशी करणार आहेत. म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद ठरलो...पुन्हा कधी लोक आम्हाला संसदेत पाठवणार नाहीत. आमचीच अशी दैना झाली म्हणजे काय करायचं? कुणी बोलायचं? पवारांच्या या गुगलीवर एकच हशा पिकला. नोटबंदीवर आज जनता गप्प असली तरी ती मतपेटीतून व्यक्त होईल. काँग्रेस सरकारने आणीबाणीचा घेतलेला निर्णय असाच अंगलट आला होता. पुढे भुईसपाट व्हावे लागले, ही आठवणही पवार यांनी करून दिली. शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळाला तर दिल्लीत त्याची चर्चा होते पण आता तर कुठल्याही पिकाला भाव राहिलेला नाही. खर्चही वसूल होत नाही. शेतीच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आंधळेपणाची भूमिका घेतली आहे, असा आरोप करून वैतागलेली जनता हा संताप निवडणूकीत दिसून आल्यावाचून राहणार नाही, असेही पवार म्हणाले.याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विनायकराव पाटील, मेळाव्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसांच्या व्यथा मांडल्या. व्यासपीठावर आमदार हेमंत टकले, नरहरी झिरवळ, दीपिका चव्हाण, रवींद्र पगार, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास जिल्हातील कांदा ऊत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
नोटाबंदीचा निर्णय नसबंदीसारखाच
By admin | Updated: January 6, 2017 01:10 IST