यावर्षी जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढलेले असले तरी वेगवेगळ्या कारणांमुळे कांदा उत्पादनात काही ाप्रमाणात घट झाली आहे. याशिवाय बोगस बियाणांमुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकरी उन्हाळ कांदा साठवून ठेवत असतात. ज्यांच्या जवळ साठवणुकीची सोय आहे त्यांना वाढीव दराचा लाभ घेणे शक्य आहे; पण ज्यांच्याकडे साठवणुकीची सोय नाही त्यांना आहे त्या दरात कांदा विकावा लागत आहे. साठवणुकीची सोय करायची म्हणजे कांदाचाळ उभारण्यासाठी लागणारे लोखंडी ॲंगल, पत्रे, जाळी, दगड, वाळू आदी साहित्य मिळणे मुश्कील झाले आहे. निर्बंधांमुळे दुकाने बंद असल्याने अनेकांना इच्छा असूनही हे साहित्य खरेदी करता येत नाही. याशिवाय सध्या होत असलेला अवकाळी पाऊस आणि बदलणारे वातावरण यापासून काढलेल्या कांद्याचा बचाव करण्याची कसरतही शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही.
कोट-
दरवर्षी जून, जुलैमध्ये कांद्याचे दर वाढत असतात; पण १५ ऑगस्टनंतर त्याचा अंदाज बांधणे शक्य असते. पावसाची स्थिती, कनार्टक, आंध्र प्रदेशमध्ये असलेले वातावरण याचाही परिणाम होत असतो. आज लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना चाळ उभी करण्यासाठी साहित्य मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय खरीप हंगामाचे नियोजन, त्यासाठी लागणारा पैसा यासाठीही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. - मनोजशेठ जैन, कांदा व्यापारी