मालेगाव/सटाणा : आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून, राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचा आरोप केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केला.कळवाडी येथे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार अद्वय हिरे आणि मालेगाव बाह्यचे उमेदवार पवन ठाकरे यांच्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री प्रशांत हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, प्रल्हाद शर्मा, आमदार अपूर्व हिरे, स्मिता हिरे, संपदा हिरे, दीपक पवार आदि होते.यावेळी गडकरी म्हणाले, राज्यात वीज व उद्योग नसल्याने तरुणांना रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कापूस स्वस्त परंतु कापड महाग आहे, अशी उत्पादकांची अवस्था वाईट आहे. तरूणांना रोजगार मिळणार नाही. परंतु आम्ही सब का साथ, सबका विकास हे धोरण अवलंबले असून आम्हाला समाजातील जातीयता नष्ट करायची आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसला चेहरा नाही. आम्ही देशाच्या विकासाचे आव्हान स्वीकारले आहे. देशातील गरिबी आम्हाला दूर करायची आहे. राज्यात भाजपचे राज्य आणल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळेल. असेही ते म्हणाले. सटाणा येथे सभासटाणा : भाजपची एकछत्री सत्ता आणण्यासाठी किटबध्द व्हा आणि विकासाच्या राजकारणाचे नवे पर्व सुरु करा असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी बागलाण विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ सटाणा येथे पाठक मैदानावर आयोजन जाहीर सभेत केले. कांदाप्रश्नी मोदी सरकार शेतकरी विरुद्ध असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत गडकरी पुढे म्हणाले कि, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळवून देण्यासाठी लवकरच आधारभूत किमती जाहीर करण्यात येणार आहेत त्यात कांद्याचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यात कांद्याला योग्य दर मिळण्यासाठी अद्ययावत चाळी उभारण्यासाठी अनुदान देणार आहे.कसमादे डाळींबाचे आगार असून या आगाराला मात्र तेल्या ग्रासले असल्याचे स्पष्ट करत गडकरी पुढे म्हणाले कि डाळिंब पिकविण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राला चालना देवून या भागात मोठा प्रक्रि या उद्योग उभारण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी प्रास्ताविक केले. सभेस भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे, आमदार उमाजी बोरसे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, नितीन वानखेडे, संजय कोडगे, आण्णा सावंत, डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, साहेबराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता पाटील उपस्थित होते. (लोकमत चमू)
नितीन गडकरी : सटाणा आणि कळवाडी येथील सभेत आरोप
By admin | Updated: September 28, 2014 23:17 IST