नाशिक/निफाड : वेळोवेळी नोटीस पाठवूनही भविष्यनिर्वाह निधीची थकबाकी न भरल्याने अखेरीस नाशिक आणि निफाड सहकारी साखर कारखान्यांतील यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता यंत्रांचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.निसाका आणि नासाका या दोन्ही कारखान्यांनी कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची भविष्यनिर्वाह निधीची थकीत रक्कम भरलेली नाही. गेल्या एप्रिल महिन्यात यासंदर्भात भविष्यनिर्वाह निधी विभागाने कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी या कारखान्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच अनेकदा स्मरणपत्र आणि रक्कम भरण्यासाठी संधी देऊनही उपयोग न झाल्याने मंगळवारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांच्या नेतृत्वाखाली या विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. आता या यंत्रसामग्रींचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. अशाच प्रकारे आता लहान-मोठ्या थकबाकीदार औद्योगिक कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वप्रथम मोठ्या उद्योगांवर कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर छोट्या कारखान्यांवरही बडगा उगारण्यात येणार आहे. थकबाकीदारांकडून १०० टक्के दंड आणि १२ टक्के व्याज आकारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या कारवाईत सहायक आयुक्त उषा गोंदे, प्रवर्तन अधिकारी आर. डी. शिरसाट यांनी सहभाग घेतला. दरम्यान, निसाकाचे सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचारी असून या सर्वांना जानेवारी २०१३ पासून कारखान्याने पगारही केलेला नाही. त्यामुळे या कामगारांच्या पगारातून कपात होणारा भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाक डे जमा झालेला नाही. कारखान्याने हा निधी जमा न केल्याने भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कारखान्याच्या पॅन विभाग आणि बॉयलर विभागात नोटीस लावली असून हे दोन्ही विभाग सील करण्यात आले आहे.
निसाका, नासाकाची यंत्रसामग्री जप्त
By admin | Updated: September 15, 2015 23:11 IST