नाशिक : महापालिकेची शुक्रवारी बोलाविण्यात आलेली महासभा निरोपाची असल्याचे समजून काही सदस्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करण्यास सुरुवात केली, परंतु मनोगतासाठी दि. ६ जानेवारी २०१७ रोजी पुन्हा महासभा होणार असल्याचे महापौरांनी जाहीर केल्यानंतर सदस्यांच्या मनात सुरू झालेला भावनांचा कल्लोळ काही काळापुरता थांबला आहे. महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.३०) बोलाविण्यात आलेली महासभा ही अखेरचीच असणार असा कयास बांधला जात होता. त्यानुसार, विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर रिपाइंच्या ललिता भालेराव उभ्या राहिल्या आणि माझा वॉर्ड पुरुषांसाठी राखीव झाल्याचे सांगत आपला पत्ता कट झाल्याचे सांगू लागल्या. यावर, महापौरांनी त्यांना सर्वसाधारण जागेवर तुम्हाला लढता येईल, असे सांगितल्यानंतरही त्यांनी पुन्हा निरोपाची भाषा सुरू केली. भालेराव म्हणाल्या, नवीन महासभेत बोललेच पाहिजे असे नाही. अनेक महिला नवीन सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आणि यापुढेही येतील. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी यासाठी सुरुवातीलाच कार्यशाळा घेतली पाहिजे. अधिकारी व नगरसेवक यांच्यात समन्वय असणेही गरजेचे असल्याचे सांगितले. सेनेचे शिवाजी सहाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, पंचवार्षिक काळात पक्षाच्या भिंती तोडून शहर विकासाची कामे झाली. अभ्यासू लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सभागृहात पहिल्यांदा पाऊल ठेवले त्यावेळी आरक्षित जागांसाठी स्वतंत्र भूसंपादन युनिट स्थापन करण्याची मागणी केली होती, परंतु अद्यापही त्यावर विचार झाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यापुढे आपण नगरसेवकपदाची निवडणूक लढविणार नसल्याचेही शहाणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनोगतासाठी सदस्य उत्सुक असताना महापौरांनी निरोपाची महासभा दि. ६ जानेवारी २०१७ रोजी होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भावनांचा कल्लोळ शमला. (प्रतिनिधी)
निरोपाचा दिवस लांबला
By admin | Updated: December 31, 2016 01:40 IST