नाशिक : रेडक्रॉस म्हणजे केवळ आपत्ती व्यवस्थापन आणि प्रथमोपचाराचे उत्कृष्ट कार्य करणारी संघटना असा सर्वदूर समज असतो. मात्र, नाशिकच्या रेडक्रॉसचे शहरी आरोग्यसेवा केंद्र, बालक लसीकरण, फिजिओथेरपी केंद्र, फर्स्ट एड प्रशिक्षण केंद्र, मानससल्ला केंद्र हे उपक्रम शहरातील गोरगरीब, निम्न मध्यमवर्गीय नागरिकांसाठी उपकारक ठरत आहेत. नाशिक रेडक्रॉसच्या या मानवतावादी कार्यातील सातत्य गत ९० वर्षांपासून कायम आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे महात्म्य नाशिककरांना आता अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. मात्र, त्याआधी गेेल्या कित्येक वर्षांपासून सामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील बालकांच्या लसीकरणाची परंपरा नाशिकला कायम आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील माता - बालकांच्या लसीकरणात नाशिक रेडक्रॉसने सर्वोत्तम योगदान दिले. गत तीन दशकांपासून करण्यात येत असलेल्या लसीकरणामुळे नाशिकमधील हजारो बालकांनी या लसीकरण केंद्रातून लसीकरणाचा लाभ मिळवला आहे. नाशिकच्या या केंद्रात मनपाकडून मिळणाऱ्या मोफत लस तर मिळतातच. मात्र, ज्या लस मनपाकडून दिल्या जात नाहीत, त्या लसदेखील नाशिक रेडक्रॉस केंद्रात अल्प दरात उपलब्ध होतात. त्यामुळे त्या लसीचा लाभदेखील हजारो बालकांना आतापर्यंत झाला आहे. त्याशिवाय अत्यंत अल्प शुल्क आकारून रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या ओपीडी सेवेच्या माध्यमातूनही हजारो रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे. त्याशिवाय फिजिओथेरपीव्दारेदेखील गरजूंना उपचार मिळत असल्याने या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेडक्रॉसच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर यांनी सांगितले. नाशिक रेडक्रॉसचे उपाध्यक्ष म्हणून ब्रिगेडिअर ए. एम. वर्टी हे कामकाज पाहतात.
इन्फो
नाशकात सेवेची नव्वद वर्ष
नाशिकच्या रेडक्रॉसची मूळ इमारत १९२९ साली उभारण्यात आली, त्यानंतर दीड- दोन वर्षांनी कामकाजाला प्रारंभ झाला. त्यामुळे नाशिक रेडक्रॉसचे यंदाचे वर्ष ही नव्वद वर्षपूर्ती आहे. इतक्या प्रदीर्घ काळापासून नाशिकला आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था नाशिकमध्ये दुर्मीळ आहेत.
कोट
दीड दशकांपासून मानद सेवा
गत दीड दशकांहून अधिक काळापासून मी रेडक्रॉस संस्थेसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंना विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवू शकलो. एका समाजोपयोगी कार्यात योगदान दिल्याचे समाधान आहे.
मेजर पी. एम. भगत, मानद सचिव, नाशिक रेडक्रॉस
फोटो
०७ नाशिक रेडक्रॉस