नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसामुळे गोदावरी, कादवा, दारणा या नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकहून जवळपास साडेतीन, तर अहमदनगरहून दोन टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे झेपावल्यामुळे या पाण्याचे आॅडिट करून तशी नोंद प्रशासनाने ठेवावी, या लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुर्लक्ष करीत, धरणांच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरअखेर केले जात असल्याचे सांगून, एकप्रकारे यंदाही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याबाबतची भीती अधोरेखित केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी अगोदर हा मुद्दा उपस्थित करून महाजन यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, जवळपास पाच ते साडेपाच टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे रवाना झाले असून, अजून पावसाळा सुरू असल्याने भविष्यातही कदाचित पाणी सोडावे लागेल, त्यामुळे जिल्ह्णातून नेमके किती पाणी मराठवाड्याला जाते त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे, जेणे करून यंदा पुन्हा समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित झाल्यास जिल्ह्णाची बाजू संबंधित यंत्रणेसमोर मांडणे सोपे होणार आहे. असाच मुद्दा आमदार अनिल कदम यांनीही उपस्थित करून धरणाचे पाणी अन्यत्र सोडण्याऐवजी कालव्यांच्या माध्यमातून बंधारे, शेततळे भरून दिल्यास या पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. तसेच डिसेंबर, जानेवारीपासून पाण्याची होणारी मागणी टाळता येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर गिरीश महाजन यांनी भाष्य करणे टाळले, मात्र त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या सर्वत्र चांगला व दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र धरणांच्या पाण्याचे नियोजन करताना त्याचे काही संकेत आहेत व सप्टेंबरमध्ये किती साठा शिल्लक आहे त्यावरच पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे जायकवाडीला नाशिक व नगरमधून जे पाणी गेल्या दोन-तीन दिवसांत सोडले गेले, त्याचा हिशेब ठेवला गेला तरी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याबाबत काय भूमिका घेते त्यावरच ते अवलंबून राहील, असे सांगितले.
जायकवाडीला जाणाऱ्या पाणीप्रश्नाला बगल
By admin | Updated: July 14, 2016 01:50 IST