नाशिक : सहकार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काढलेल्या अध्यादेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे ११ संचालक अपात्र ठरण्याच्या प्रकरणावरून दाखल असलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसमोर सुरू असलेल्या या प्रकरणात ११ संचालक अपात्र ठरल्याची गुरुवारी दिवसभर जिल्ह्णात चर्चा होती. मात्र ती अफवाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले. याप्रकरणी गुरुवारी सुनावणी होऊन पुढील सुनावणी १८ आॅगस्टला होणार असल्याची अधिकृत माहिती बॅँकेच्या संचालकांनी दिली.सहकार विभागाने मंजूर केलेल्या नवीन कायद्यानुसार प्रशासकीय मंडळ लागू करण्यात आलेल्या संचालकांना दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सहभागी होता येणार नाही. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत निवडून आलेल्या २१ पैकी ११ संचालकांना या कायद्यानुसार अपात्रता ठरविण्याच्या नोटिसा विभागीय सहनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच बजावलेल्या आहेत. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या या ११ संचालकांमध्ये विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तिघा माजी आमदारांचा तसेच एका विद्यमान आमदाराचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
संचालक अपात्रप्रकरणी पुढील सुनावणी १८ आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:16 IST