कळवण : सटाणा तालुक्यातील निताणे येथील नवविवाहितेला माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रु पये घेऊन येण्यासाठी मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात मारहाण व खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत नवविवाहिता मोहिनी किशोर देवरे (१९) हिचे वडील हंसराज श्यामराव देवरे (४५) रा. कळवण खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जायखेडा पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांनी दिली.मयत मोहिनी हिला माहेरून बुलेट घेण्यासाठी एक लाख रु पये घेऊन येण्यासाठी किशोर देवरे (रा. निताणे) याने गेल्या काही दिवसांपासून मोहिनी हिला मारहाण करून माहेरी पाठवून दिले होते. तेव्हा कळवण खुर्द येथे आलेल्या मुलीला एक महिना आपल्याकडे ठेवलेल्या वडिलांनी एक महिन्यानंतर घ्यायला आलेला जावई किशोर देवरे यांची समजूत काढून देत माझ्याकडे पीक पाणी आल्यानंतर पैशाची व्यवस्था करण्याचे सांगितले व मुलीस जावयासोबत सासरी पाठवून दिले होते; मात्र त्यानंतरही तिला सासरच्या मंडळीकडून मानसिक त्रास होत होता; मात्र दि. २२ मार्च २०१६ रोजी रात्री नऊच्या सुमारास जावयाने फोन केला व तुमची मुलगी अत्यवस्थ आहे व तिला ग्रामीण रु ग्णालय सटाणा येथे दाखल केले असल्याचे सांगितले. अशा वेळी तत्काळ मी, माझी पत्नी व नातेवाईक आम्ही सटाणा रु ग्णालयात गेलो असता तेथे मुलगी मयत झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय तेथे मुलीच्या सासरकडील कुणीही भेटले नाही व दवाखान्यात कुणी दाखल केले याची माहिती उपलब्ध झाली नाही. यामुळे सासरची मंडळी, मुलीचे पती- किशोर पोपट देवरे, सासरे - पोपट वेडू देवरे, सासू - निर्मलाबाई पोपट देवरे, चुलत सासरे- रघुनाथ वेडू देवरे व चुलत सासू रघुनाथ देवरे यांची पत्नी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होण्यासाठी मयत मुलगी मोहिनी देवरे हिचे वडिलांनी जायखेडा पोलीस स्थानकात समक्ष हजर राहून फिर्याद दिली असून जायखेडा पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक होळकर हे करीत आहेत. (वार्ताहर)
मोटारसायकलसाठी नवविवाहितेचा खून
By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST