लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असून, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने प्रदूषणामुळे मानवी आरोग्यासोबत झाडांचेही नुकसान होत असल्याची तक्रार पंचवटी पांजरापोळ या संस्थेने केली आहे. सारूळ व राजूर बहुला या ठिकाणी असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करून या ठिकाणी खडी क्रशर चालविले जात आहे. अनेक वर्षांपासून दिवस रात्र सदरचे काम केले जात असून, परिसरातील डोंगर, टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोहचल्या आहेत. दगड उपसा करताना खाणमालकांकडून बोअर ब्लास्टिंग केले जात असून, त्यासाठी घातक स्फोटकांचा वापर केला जात आहे. परिणामी या भागातील घरांना तडे पडले असून, तेथे राहणे धोकादायक झालेले आहे. स्फोटकांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या खोदकामावर बंदी घालण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यापार्श्वभूमीवर नाशिक तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटी पांजरापोळ या संस्थेनेही तक्रार केली आहे. सारूळ शिवारात संस्थेची जागा असून, या ठिकाणी सेंद्रियपद्धतीने शेती केली जाते. पेरू, आंबे, सीताफळ, चिकू आदि शेकडो झाडे या ठिकाणी आहेत तसेच जनावरांसाठी चाराही पिकविला जात आहे, परंतु दिवसरात्र डोंगर उत्खननामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील जमिनीची पोत खराब होऊन झाडांनाही प्रदूषणाचा फटका बसून त्यांच्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे.
सारूळच्या उत्खननाकडे प्रदूषण खात्याचे दुर्लक्ष
By admin | Updated: May 15, 2017 00:27 IST