सिडको : येथील डीजीपीनगर क्रमांक दोन भागांत असलेल्या नोंदणीकृत श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभाराविरोधात संस्थेच्या अध्यक्षांसह अन्य सभासदांची चौकशी करावी यासाठी संस्थेचे सभासद नंदू शिंदे व सदस्यांनी जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे.श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा १९६० अन्वये स्थापन झालेली आहे. सदर सहकारी संस्थेचे स्थापनेपासून एकच अध्यक्ष आहे. या संस्थेत गेल्या काही वर्षांत अनेक आर्थिक व इतर गैरप्रकार झालेले असतानाही आजवर अध्यक्षांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, परंतु या विरोधात आता संस्थेचे सभासद नंदू शिंदे व इतर सदस्यांनी एल्गार पुकारलेला आहे. संस्थेच्या अध्यक्षांसह त्यांना जोडलेल्या इतर पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांत संस्थेत निवडणूक, वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. तसेच लेखा परीक्षण करण्यात आलेले नाही. लेखा परीक्षकांना संस्थेचे कागदपत्रे न देता, लेखा परीक्षण केल्याचा व देखावा सभासदांसमोर करण्यात आला असल्याचा आरोपही नंदू शिंदे यांनी केला आहे. याप्रकरणी संस्थेच्या सदस्यांनी सहकार विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याने सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात विभागीय सहनिबंधक तसेच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर नंदू शिंदे यांच्यासह अरुण भावसार, सुरेश भडकवाडे, रामदास कोंबडे, नितीन कोल्हे, काशीनाथ मुसळे, मनोहर पाटील, सीताराम भांड आदिंसह पन्नासहून अधिक सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गृहनिर्माण संस्थेत गैरकारभार?
By admin | Updated: December 13, 2015 21:52 IST