इंदिरानगर : नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापतिपदी महाआघाडीच्या उमेदवार व राष्ट्रवादीच्या नगरसेवक नीलिमा आमले यांची बिनविरोध निवड झाली. मनसेच्या बंडखोर उमेदवार दीपाली कुलकर्णी यांच्यासह पाचही उमेदवारांनी माघार घेतल्याने नीलिमा आमले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मेनरोडवरील पूर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता निवडणूक अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले व रंजना पवार, मनसेतून भाजपात दाखल झालेल्या दीपाली कुलकर्णी, कॉँग्रेसच्या समीना मेमन, मनसेच्या सुमन ओहोळ आणि अपक्ष रशिदा शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाआघाडीने राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले यांची उमेदवारी घोषित केली आणि तसा व्हिपही आपल्या सदस्यांना बजावला. अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला असता दीपाली कुलकर्णी, समीना मेमन, सुमन ओहोळ, रशिदा शेख व रंजना पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलिमा आमले यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी मनसेचे यशवंत निकुळे, सुमन ओहोळ, मेघा साळवे, भाजपाचे सतीश कुलकर्णी, मनसेतून भाजपात दाखल झालेले सतीश सोनवणे, अर्चना थोरात, राष्ट्रवादीचे संजय साबळे, सुफीयान जीन, रंजना पवार, कॉँग्रेसचे शाहू खैरे, वत्सला खैरे, समीना मेमन, राहुल दिवे, अपक्ष संजय चव्हाण, रशिदा शेख व शबाना पठाण आदि उपस्थित होते. यावेळी नीलिमा आमले यांचा महापौर अशोक मुर्तडक व स्थायी समिती सभापती सलीम शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पूर्व प्रभाग सभापतिपदी नीलिमा आमले
By admin | Updated: April 13, 2016 23:52 IST