चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातर्फे आजच्या युगातील प्रगतिशील व भविष्यात गरज म्हणून ओळखल्या गेलेल्या सीएफडी या तंत्रज्ञानाविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि औद्योगिक क्षेत्रातील सतत अद्ययावत होणारे तंत्रज्ञान व निकष यामधील तफावत कमी करणे असा होता. यासाठी नाशिक येथील मातोश्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्रा. तुषार कापडे यांचे तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन लाभले. व्याख्यानाद्वारे प्रा. कापडे यांनी सीएफडीमधील विविध गणिती संकल्पना, सॉफ्टवेअर्स, प्रोग्रामिंग तसेच नोकरी व उद्योगाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानाचा लाभ यांत्रिकी अभियांत्रिकीच्या सुमारे १२० विद्यार्थ्यांना झाला. प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, विभागप्रमुख प्रा. एम. एम. राठोड उपस्थित होते. प्रा. एच. आर. ठाकरे, प्रा. एस. यू. पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
‘तंत्रज्ञान व निकष यातील तफावत कमी होण्याची गरज’
By admin | Updated: September 27, 2016 00:31 IST