अवयवदानाविषयी जनजागृतीची गरजनाशिक : भारतात हजारो रुग्ण अवयव निकामी होऊन मृत्यू पावतात. मात्र अवयवदानातून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकते. आपल्याकडे अवयवदानाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने अवयवदानाविषयी समाजातील सर्व स्तरात सोशल माध्यमांसह विविध प्रकारे जनजागृती करण्याची गरज असल्याचा सूर ‘अवयवदान काळाची गरज’ परिसंवादातून उमटला. यावेळी प्रत्यारोपणतज्ज्ञ, फुफ्फुस प्रत्यारोपणतज्ज्ञ व हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञांनी अवयवदानाविषयी विविध माध्यमांतून जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली.अवयवदान दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, फोर्टिस हॉस्पिटल आणि रोटरी क्लब आॅफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘अवयवदान काळाची गरज’ विषयावर परिसंवाद पार पडला. व्यासपीठावर आयएमएचे डॉ. अनिरु द्ध भंडारकर, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. सुरेश सूर्यवंशी यांच्यासह डॉ. राजेंद्र नेहेते, भावेश पटेल, किशोर पटेल, राजेश पाटील आदि उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना प्रत्यारोपण तज्ज्ञ राहुल पंडित यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, आपल्या स्वकियांना मृत्यूनंतरही अवयवाच्या रूपाने जीवित ठेवण्यासाठी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी अवयवदानासाठी पुढे येण्याची गरज आहे, तर हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी रुग्णास मेंदूमृत घोषित करण्याची आणि अवयवदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया झेडटीटीसीच्या नियंत्रणात होत असल्याने या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोणत्याही जाती धर्माचा तसेच आजार असलेला व्यक्ती अवयवदान करू शकतो. त्यासाठी अवयवदान करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने अथवा मृतावस्थेतील व्यक्तीच्या नातेवाइकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अवयवदान दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचे व्यवस्थापन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले. डॉ. प्रशांत देवरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
अवयवदानाविषयी जनजागृतीची गरज
By admin | Updated: August 14, 2016 02:16 IST