नाशिक : जागतिक स्तरावार शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध स्तरावार सुप्रशासन आणि अहिंसेसाठी शांतता मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्र म विकसित करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक शांतता परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात उमटला. चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाच्या विषयालाही यावेळी हात घातला.एसएमआरके महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या शांतता परिषदेत ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ विषयी परिचर्चेत जागतिक नागरिकत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. आग्यार होते. सहअध्यक्ष अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख होते. या चर्चेत अमेरिकेतील मुलांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेच्या संस्थापक डॉ. नीना मेयरहॉफ, अमेरिकेतील नॅशनल हार्मोनी पीस अकॅडमीचे महासंचालक लज उतरेजा, हवाईयन आर्ट आॅफ प्रॉब्लेम सॉल्व्हिगच्या (हवाई) कार्यकर्त्या डेम मेबल काटझ, नागालँड मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रियरंजन त्रिवेदी, नेपाळच्या शांतता शिक्षिका संध्या ह्योलोमो यांनी सहभाग घेतला. उपस्थित तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाची संकल्पना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येणे अवघड म्हटले. शांतता शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा आणि तज्ज्ञांनी त्यासाठी सूचना कराव्यात, असा मतप्रवाह परिचर्चेत उमटला. परस्पर सहकार्य वाढविले आणि गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण मिळाली तर सुशासन शक्य असल्याचे मत परिसंवादत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सरिता औरंगाबादकर आणि संजय पाबारी यांनी केले. (प्रतिनिधी)
शांतता मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज
By admin | Updated: October 26, 2016 00:00 IST