नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी करताना राष्ट्रीयीकृत बॅँकांना संबंधित कर्जासाठी अर्ज करणाऱ्या उद्योजक, व्यावसायिक आणि युवकांना अद्ययावत माहिती दिली जात नाही. त्यामुळे या बॅँकांमध्ये माहितीचा अधिकार लागू करावा आणि जनमाहिती अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, तसेच महाराष्ट्र बॅँकेचे प्रताप मोहंती,अग्रणी अधिकारी अशोक चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शासनाने मुद्र कर्जसंबंधी लीड बॅँकेने कोणकोणत्या बॅँकांना किती उद्दिष्ट दिले आहे. शिशू, किशोर आणि तरुण योजनेअंतर्गत कोणत्या शाखेला किती उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी त्या बॅँकेला किती रक्कम पाठविण्यात आली आहे. याबाबत बॅँकांकडून अधिकृत माहिती उपलब्ध व्हावी यासाठी फलक लावला पाहिजे, तसेच माहिती देण्यासाठी जनमाहिती अधिकारी नियुक्त केला पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या अशी व्यवस्था नसल्याने बॅँकांकडून युवकांना योग्य माहिती मिळत नाही. इतकेच नव्हे तर शाखेचे टार्गेट संपले, असे सांगून बोळवणूक केली जाते. त्यामुळे माहिती अधिकार कायदा लागू करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष छबू नागरे, युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, संतोष सोनपसारे, वैभव देवरे, संजय खैरनार, नितीन चंद्रमोरे, महेश भामरे, भुवनेश कडलग, समीर रत्नपारखी, शेख रशीद चांद आदि उपस्थित होते.
बॅँकेत माहितीचा अधिकार लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी
By admin | Updated: October 4, 2015 00:04 IST