नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प असल्याने नायगाव खोऱ्यात ऐन पावसाळ्यातच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने देशवंडी, जायगाव, वडझिरे येथील महिलांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.महिनाभरापूर्वी शिंदे-पळसे गावाजवळ जलवाहिनी फुटल्याने योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जलवाहिनी दुरुस्तीचे काम लांबल्यामुळे नायगाव पाणीपुरवठा योजनेच्या देशवंडी, जायगाव, वडझिरे, मोह, मोहदरी या गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.नायगाव खोऱ्याला संजीवनी ठरलेल्या या योजनेकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम रखडले असून, अधिकाऱ्यांना याबाबत भ्रमणध्वनीहून माहिती दिल्यानंतरही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महिनाभरापासून बंद असलेली नायगाव नळपाणीपुरवठा योजना लवकरात लवकर दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी जायगावच्या सरपंच नलिनी गिते, विठ्ठल गिते, सुकदेव गिते, महादू गिते, संतोष दिघोळे, अरुण दराडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना ठप्प
By admin | Updated: August 14, 2016 00:24 IST