पंचवटी : केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी दलितांवरील हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन सिंह यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शुक्रवारी दहन करण्यात आले. दलित हत्त्याकांडाविषयी बोलताना सिंग यांनी केंद्र शासनाच्या बाबतीत बचावात्मक भूमिका घेताना कोणी कुत्र्याला दगड मारला तरी सरकारला जबाबदार धरणार काय, असा प्रश्न केला होता, त्यातून करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला असून केंद्रीय मंत्र्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करून काही ठरावीक समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार केला असून, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. केंद्रीय मंत्र्यांनी केलेले वक्तव्य मागे घेऊन जनतेची माफी मागावी, अशी मागणी करून राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सिंह यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आमदार जयंत जाधव, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, युवकचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे, नाना महाले, अमोल नाईक, मनोहर कोरडे, देवांग जानी, बाळासाहेब पाटील, दीपा कमोद, चित्रा तांदळे, सीमा निकुंभ आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आमदार जाधवांवर गुन्हा
केंद्रीय मंत्री व्ही़ के.सिंह यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़