सातपुर : गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट चॅप्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स या संस्थेच्या संपूर्ण भारतात शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील अभियंत्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. नाशिक शाखेच्या वतीने गेल्या वर्षभरात जे काही अनेकविध उपक्र म राबविले गेले त्या उपक्र मांची दखल घेऊन शाखेला भारतातील बेस्ट चॅप्टरचा तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ कर्नाटक राज्यातील धारवाड येथे पार पडला. नाशिक शाखेच्या वतीने संस्थेचे सदस्य तथा के. के. वाघ महाविद्यालयातील प्राध्यापक विलास पाटील यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. एस. सोंडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी अभियंता शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एन. व्ही. मुरलीकृष्णा रेड्डी, सत्यनारायन रेड्डी, विजय बहाले, डॉ. मृत्युंजय कपाली आदि उपस्थित होते. नाशिक शाखेचे अध्यक्ष नरेंद्र बिरार, अपूर्वा जाखडी, आशिष कटारिया, विपुल मेहता, मनीष कोठारी, प्राचार्य प्रशांत पाटील आदिंनी या पुरस्काराचे स्वागत केले आहे. (वार्ताहर)
अभियंता शाखेला राष्ट्रीय पुरस्कार
By admin | Updated: October 17, 2015 23:01 IST