सिन्नर : औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाची वारी २०१६-१७ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचे पथक उत्कृष्ट ठरले. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नववी व दहावीचा शंभर टक्के निकाल असलेल्या शाळांची शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांतून माध्यमिक विभागाचे ५० व प्राथमिक विभागाचे १०० मुख्याध्यापक व शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शाळेचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती सदर कार्यक्रमात सादर करण्यात आली. त्यात नाशिक जिल्हा पथकाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे, सुटीकाळात विद्यार्थ्यांच्या ज्यादा तासिका, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, ज्ञानरचनावादाचा अवलंब करणे, डिजिटल स्कूल, ई-लर्निंग, सृजनशील शिक्षण, पालक प्रबोधन, ग्रंथालयातील पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर, शाळा भेटी उपक्रम, शिक्षण तज्ज्ञांच्या मुलाखती या विषयांवर प्रात्यक्षिके सादर केली.शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे, उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, सुनीता धनगर, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकात शरद रत्नाकर, शिवाजी रहाटळ, आर. पी. म्हस्के, बी. व्ही. पांडे, के. बी. ढोली, बी. एन. भवर, विस्तार अधिकारी राजीव लहामगे, आर. पी. जोशी, किरण कुवर, आर. आ. निकम, एस. टी. बागूल, एस. डी. बच्छाव, डी. के. बिरारी, के. एल. वाक्चौरे, चित्रा नरवडे यांचा समावेश होता. शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी नाशिक पथकाचे कौतुक करताना जलदगती शिक्षणात नाशिक आघाडीवर असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
शिक्षणाच्या वारीत नाशिकचे पथक उत्कृष्ट
By admin | Updated: January 20, 2017 23:03 IST