नाशिक : थंडीची तीव्रता हळूहळू वाढत असून, सलग दोन दिवसांपासून नाशिक शहरात राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद होत आहे. रविवारीही नाशिकचे किमान तपमान १३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. चालू मोसमातील हे नीचांकी तपमान आहे. पंधरवड्यापासून थंडीची चाहूल लागली होती; मात्र मधल्या काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. दिवाळीपासून थंडी पुन्हा वाढू लागली आहे. ११ नोव्हेंबरपासून नाशिकचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आज रविवारपर्यंत किमान तपमानात सुमारे दोन अंशांनी घट झाली आहे. काल शनिवारी व आज सलग दोन दिवस शहराचे तपमान राज्यात नीचांकी होते. रविवारी नाशिकच्या खालोखाल नांदेड (१३.५), पुणे (१४.३), जळगाव (१६), परभणी (१६.३) येथे किमान तपमानाची नोंद झाली. पहाटे व रात्री थंडीचा कडाका जाणवू लागल्याने नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. बाजारात स्वेटर, कानटोप्या, कानपट्ट्या, स्कार्फ खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वातावरण ढगाळ झाल्यास थंडीच्या तीव्रतेवर परिणाम होतो. यंदा तसे न घडल्यास दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
नाशिकचा पारा राज्यात नीचांकी
By admin | Updated: November 16, 2015 00:04 IST