नाशिक : आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाची आज विजयादशमीला सांगता होत आहे. खास दसऱ्यानिमित्त नाशिकमधल्या सराफ बाजारात तेजीचे वातावरण बघायला मिळते आहे. शहरातील सराफ व्यावसायिकांनी खास दसऱ्यानिमित्त अनेक योजना ग्राहकांसाठी आणल्या आहेत. विविध योजनांमध्ये मजुरीवर सूट, आकर्षक बक्षिसे, लकी ड्रॉ स्कीम, जेवढी सोने खरेदी तेवढी चांदी मोफत अशा नानाविध योजना ग्राहकांना आकर्षित करत आहेत.नाशिकमधील ज्वेलर्समध्ये अनेक आकर्षक डिझाईन्स दाखल झाल्या असून, मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेसच्या अनेक व्हरायटी बाजारात बघायला मिळतात. सराफा बाजारावर यावर्षीही टीव्ही मालिकांचा प्रभाव बघायला मिळतो. टेम्पल ज्वेलरी प्रकारात जय मल्हार मालिकेतील दागिन्यांना महिला वर्गाकडून विशेष मागणी आहे. सोन्याचे दर तुलनेने कमी असले तरी, ते सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचेच आहेत. त्यामुळे ग्राहकांना या मुहूर्तावर सोने खरेदी करता यावे, यासाठी अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची वळी, नाणी यांच्याबरोबरच ग्राहकांच्या मागणीप्रमाणे हवे ते देण्याचा प्रयत्न सराफ व्यावसायिकांकडून असणार आहे. (प्रतिनिधी)
सोन्याच्या खरेदीला नाशिककरांची पसंती
By admin | Updated: October 21, 2015 23:36 IST