नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराविषयी कितीही वाद-प्रवाद असले तरी राष्ट्रीय पातळीवरील तपासणीत नाशिकचा विसावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. ऑगस्ट महिन्यात नाशिक राज्यात प्रथम क्रमांकावर होते. मात्र, आता काही गुणांनी पुणे आघाडीवर असल्याचे केंद्र शासनाच्या तपासणीनंतर जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने ऑगस्ट २०१४ मध्ये राज्यातील आठ शहरांची स्मार्ट सिटी येाजनेंतर्गत निवड केली असून, आता ही योजना जून २०२१ मध्ये संपणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत सहभागी शहरांनी केंद्र सरकारला २२ हजार ५८६ कोटी रुपयांचे प्रकल्प अहवाल केंद्र शासनाला सादर केले आहेत. त्या अंतर्गत केंद्र शासनाकडून या शहरांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असला तरी त्यानुरूप गतीने कामे झाली नसल्याचे दिसत आहे. राज्याची सरासरी तपासली तर ३३ टक्केच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची देखील गती मंदावली आहे. अनेक प्रकल्प पूर्ण झाले नाहीत किंवा वादात अडकले असले तरी राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारच्या तपासणीत मात्र नाशिक पुढेच आहे. अर्थात, गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात नाशिक महापालिका आघडीवर होती; आता मात्र नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार पुण्याचा राष्ट्रीय पातळीवर १८ वा तर राज्यात पहिला क्रमांक आहे. नाशिकचा राष्ट्रीय पातळीवर विसावा आणि राज्यात दुसरा क्रमांक आहे. नाशिक महापालिकेच्या प्रकल्पाबाबत स्थानिक संचालकात वाद असला तरी राष्ट्रीय पातळीवर मात्र बऱ्यापैकी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
इन्फो..
दृष्टिक्षेपात कामगिरी
एकूण प्रकल्प- ५३
एकूण प्रकल्प किंमत- ४ हजार ३८४ कोटी
पूर्ण झालेले प्रकल्प- २२ (४५२ कोटी)
कार्यारंभ दिलेली कामे- १९ (२ हजार २७९ कोटी)
निविदास्तरावरील कामे- ५ (९७५ कोटी)
प्रकल्प अहवाल स्तरावर- ७ (६७६ कोटी)