नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा असल्याने अहमदनगर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांनी नासाकाच्या सभासदांची यादी मागविली असून, नासाकाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती अध्यक्ष माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी दिली. यासंदर्भात नासाकाला ३० आॅक्टोबर रोजीच साखर प्रादेशिक सह संचालकांचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रान्वये नासाकाच्या सभासदांची यादी १० दिवसांच्या आत संचालक कार्यालयास पाठवावी लागणार आहे. जे सभासद मयत झालेले आहेत. त्यांच्या वारसांनी आपल्या मयत वारसाचे नाव त्वरित कारखान्याकडे लेखी पूर्ण पत्त्यासह कळवावे,असे आवाहन अध्यक्ष देवीदास पिंगळे यांनी केले आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाच्या पोटनियमाप्रमाणे शेअर्सची किंमत पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्यात आली आहे. हा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्याचा दावा पिंगळे यांनी केला आहे. ज्या सभासदांनी शेअर्सची रक्कम दहा हजारांच्या आत आहे. त्यांनी ती उर्वरित रक्कम कारखान्याकडे पूर्ण भरून शेअर्सची किंमत पूर्ण करावी. तसेच नाशिक सहकार साखर कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने नाबार्डला शिफारस केली आहे. याबाबतीत नाबार्डने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी बैठक बोलविली असून, नाबार्डने सकारात्मक चर्चा केली असून, त्यामुळे नासाका सुरू करण्याचा लवकरच मार्ग मोकळा होईल, अशी माहिती नासाकाचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
नासाका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच
By admin | Updated: November 7, 2014 00:44 IST