नाशिक : वादळी वारा व मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीवर पाणी फिरल्यानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा शेकडो हात कामाला लागले. उन्मळून पडलेले विजेचे टॉवर, ध्वनिक्षेपकाचे खांब व कललेले व्यासपीठ उभारण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाली असून, सुरक्षाव्यवस्थेचा फेरआढावा घेऊन पोलिसांची रंगीत तालीमही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तीन तास अगोदर रविवारी तुफान पाऊस व वादळामुळे सर्व नियोजन कोलमडले. परिणामी सभा रद्द करण्यात आली; पण त्यानंतर लागलीच ही सभा मंगळवारी घेण्याचे जाहीरही करण्यात आले. तपोवनातील साधुग्रामच्या ज्या जागेवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ती जागा शेतजमीन असून, रविवारच्या पावसामुळे चिखल व जागोजागी तळी साचली आहेत. त्यामुळे सभेचे ठिकाण बदलण्याचा मतप्रवाह पोलीस व प्रशासकीय यंत्रणेने बोलून दाखविला; परंतु आयोजकांनी आहे त्याच जागेवर सभा घेण्याचे ठरविल्याने रविवारी रात्रीपासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त मजूर लावण्यात आले असून, वादळाने जमीनदोस्त झालेले विजेच्या टॉवर्सची उभारणी, लोखंडी बॅरेकेटिंग, ध्वनिक्षेपकाचे खांब पुन्हा उभारण्याच्या कामास गती देण्यात आली.
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारी पुन्हा
By admin | Updated: October 7, 2014 01:30 IST