नांदगाव : गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या प्रलयकारी अतिवृष्टीने नांदगाव शहराची वाताहत केली असून, शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. रेल्वेच्या १६० वर्षांच्या काळात प्रथमच पाणी नांदगावच्या प्लॅटफॉर्मला लागले. घरांचे पहिले मजले पाण्यात बुडाले, तर रेल्वेचा नवीन सबवेसुध्दा पाण्यात बुडाला. महापुराच्या तडाख्यात नदी किनाऱ्यावर असलेली घरे, छोट्या व्यावसायिकांची दुकाने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून वाहून गेली. सन २००९मध्ये आलेल्या महापुराच्या आठवणी जाग्या होत असताना, यावेळी पुराचे अवसान अधिकच विनाशकारी ठरले आहे. दहेगाव धरण भरून, लेंडी नदीला पहिला पूर आला. त्या लाटेचा पहिला तडाखा महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान असलेल्या पुलावरील अतिक्रमणांना बसला. या पुलावर चपला, किराणा, स्टेशनरी, फुटकळ साहित्य, चहाची टपरी, मोबाईल, इलेक्ट्रिकची दुकाने असून ती थेट नदीपात्रातच आहेत. पाण्याच्या शक्तीने आरसीसी बांधकाम असलेली दुकाने काड्यापेटीप्रमाणे फिरवली तर इतर दुकाने काही मिनिटातच प्रवाहपतित झाली.
लेंडी नदीपात्राला समांतर समता मार्गावर लोहार, सलून, चहा, हॉटेल्स, भंगारचे व्यावसायिक, ज्यूस, चपला अशी अनेक दुकाने आहेत. परंतु या मार्गावर पत्र्याची व कच्चे बांधकाम असलेली घरेसुध्दा आहेत. या सर्व घरात चार ते पाच फूट उंच पाणी साठले होते. घरातली भांडी, कपडे, सामानाच्या पेट्या सर्व जलमय होऊन मोठे नुकसान झाले. आज खायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आंबेडकर चौकात असलेल्या दुमजली व्यापारी संकुलाचा खालचा मजला पूर्णपणे पाण्यात गेला. त्यात कापडाची रेडिमेड होजीअरीची, चपला, बूट याची गोदामे आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत तिथे सात ते आठ फूट उंचीपर्यंत पाणी साठलेले होते.
----------------------
दळणवळण यंत्रणा कोलमडली
लेंडी नदीच्या पुलावर गुप्ता स्टोअर्सचे जड दुकान पाण्याच्या रेट्यापुढे रस्त्यातच आडवे झाल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. रेल्वेने बांधलेला सब वे आठ फूट उंचीच्या पाण्याने भरून गेला. त्यामुळे औरंगाबाद - येवला रस्त्याकडे असलेल्या शहराच्या दुसऱ्या भागातील व मल्हारवाडी गावाकडील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दहेगाव नाका ते भोंगळे रस्त्यावर लेंडी नदी पात्रापर्यंत पाणीच पाणी झाले होते. गुलजारवाडी परिसरात घरांमध्ये दोन ते चार फूट उंचीचे पाणी शिरल्याने घरांमध्ये सर्वत्र गाळ साचला आहे. मटण मार्केट, बाजार समिती यात चिखल झाला.
-----------------
शाकांबरी पुलावरून पाणी
रात्री तुफान आलेल्या शाकांबरी व लेंडी नदीपात्रात महिलांनी नदी शांत व्हावी म्हणून खणा नारळाने ओटी भरली, तर मशिदीत पूर कमी होण्यासाठी रात्री नमाज अदा करण्यात आली. सकाळी उजेडात आपला विखुरलेला संसार शोधतांना महिला व मुले दिसून आली. कोणाच काय, अन कोणाच काय, अशी टिप्पणी करत संधीसाधू दुसऱ्याच्या घरातील वस्तू पळवत असल्याची चर्चा झाली. रात्री १२ वाजल्यापासून अडीच तासपर्यंत शाकांबरी नदी पुलावरून पाणी वाहात असल्याने वाहतूक बंद होती.