मनमाड : शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा उत्सवामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेची ज्ञानेश्वरी ग्रंथासह सजवलेल्या रथातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. ज्ञानोबा माउलीच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.मनमाड येथील श्री दत्तोपासक मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणामध्ये असंख्य स्त्री-पुरुष भाविक सहभागी झाले आहेते. या उत्सव सोहळ्यात रोज पहाटे काकड आरती, श्रींची पाद्यपूजा, अभिषेक, सनईवादन, ज्ञानेश्र्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन व प्रवचन या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला.समारोपानिमित्त माउलीच्या प्रतिमेची व ज्ञानेश्वरी ग्रंथाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानोबा माउलीचा गजर करत शेकडो पुरुष व महिला भाविक दिंडीमध्ये सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरांची भव्य प्रतिमा, पादुका, भगवे ध्वज, रोेषणाई, भरगच्च धार्मिक कार्यक्रम आणि ज्ञानेश्वर माउलीचा जयघोष यामुळे मंगलमय वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन दत्तोपासक मंडळाचे अध्यक्ष सुरेश माणके, श्रीराम शिरसाठ, जयंत भुधर, प्रशांत जोशी, किरण कात्रे, सतीश जोशी, गणेश गरुड, नितीन जोशी यांंच्यासह कार्यकर्त्यांनी केले. (वार्ताहर)
ज्ञानोबा माउलीच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा
By admin | Updated: December 8, 2015 23:50 IST