नाशिक : शहरात महिलांचे मंगळसूत्र व पोत खेचून नेण्याच्या घटना सुरूच असून, या सोनसाखळी चोरट्यांना रोखण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही़ बसमधून उतरून घराकडे पायी जाणाऱ्या वृद्धेचे दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास येथील दत्तमंदिररोड परिसरात घडली़ धोंगडेनगरमधील अॅक्वालाइन रेसिडेन्सीतील रहिवासी शकुंतला एकनाथ भागवत (६०) या पंचवटीत कामानिमित्त गेल्या होत्या़ पंचवटीतील काम आटोपल्यानंतर शहर बसने त्या नाशिकरोडला परतल्या़ बसमधून दत्तमंदिर स्टॉपवर उतरून घराकडे पायी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले़ याप्रकरणी भागवत यांच्या फिर्यादीवरून जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोडला वृद्धेचे मंगळसूत्र खेचले
By admin | Updated: April 5, 2017 00:39 IST