मृत युवक सिन्नर तालुक्यातील : चौघांना अटक; अठरा तासात केली उकललासलगाव : देवगाव-कोळपेवाडी रस्त्यावर सात मोरीजवळ बुधवारी एका पंचवीसवर्षीय युवकाचा डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापत करून खून केल्याप्रकरणी अवघ्या अठरा तासात दोन बालगुन्हेगारांसह दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आहे.देवगाव ते कोळपेवाडी रस्त्यावर बुधवारी (दि. ६) दुपारी १ वाजेच्या सुमारास शिरवाडे शिवारातील सातमोरीखाली तोंडावर व डोक्यावर गंभीर दुखापत करत अज्ञात पंचवीस वर्षे वयाच्या युवकाचा खून झाल्याचे लक्षात आले. शिरवाडे येथील पोलीसपाटील रामनाथ गेणू पाटील यांनी याबाबत लासलगाव पोलिसांनाकळविले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. खून झालेल्या युवकाच्या अंगावर निळी जिन्स पॅँट, लाल टी शर्ट होता. याबाबत दुपारी लासलगाव येथील पोलीस ठाण्यात कैलास दरगुडे यांनी फिर्याद दिली व गुन्ह्यांची नोंद झाली. खून झालेल्या घटनास्थळी मोबाइल, सिमकार्ड, दगडगोटा व बॅटरी पोलिसांनी जप्त केली होती. सिमकार्डच्या साहाय्याने सायंकाळी ६ वाजता हा मृतदेह सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी रोहन ऊर्फ पवन उत्तम दिवे याचा असल्याचे निष्पन्न झाले. या सिमकार्डचे कॉल रेकॉर्ड तपासले असता एका अल्पवयीनास पोलिसांनी ताब्यात घेतले असता खून झालेला रोहन हा वाहन चोरून मरळगोई व विंचूर येथील तिघांना विक्र्री करत असल्याची माहिती मिळाली व चोरीच्या गाडीचे पैसे दिले नाही तर तुमची नावे पोलिसांना सांगेल अशी धमकी देत असल्याने रोहन ऊर्फ पवन दिवे याला विंचूर येथे फोन करून बोलाविले व विंचूर वाईन पार्क येथे नेले. यापूर्वी मरळगोई बुद्रूक येथील कैलास दत्तात्रय जगताप, सागर चांगदेव जगताप व आणखी दोन अल्पवयीन मुलांनी एक बिअर घेऊन त्यात लिवोसीन नावाचे पिकांवर फवारणीसाठी वापरले जाणारे घातक कीटकनाशक टाकून ती रोहनला पाजली. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. याच ठिकाणी त्याला खाली पाडल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली. त्यानंतर रोहनला या चौघांनी मोटारसायकलवर सातमोरी येथे आणले. तेथे त्याच्या डोक्यात दत्तात्रय जगताप व सागर चांगदेव जगताप यांनी दगड घालून त्याचा खून केला व पळ काढला.बुधवारी दुपारी हा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या अठरा तासात दत्तात्रय जगताप व सागर चांगदेव जगताप यांना अटक केली तर या गुन्ह्यातील सहभागी आणखी दोन जण अल्पवयीन निघाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या दोघांना निफाडच्या प्रथमवर्ग न्यायाधीश एस.व्ही. मडके यांच्या समोर हजर केले असता ११ जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. सानप करीत आहेत. (वार्ताहर)
सिमकार्डवरून खुनाचा गुन्हा उघड
By admin | Updated: January 7, 2016 22:18 IST