नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेत लाभार्थींऐवजी भाडेकरू राहत असल्याचा प्रकार उघड करण्यासाठी पूर्व विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत शिवाजीवाडीत लाभार्थींनाच भाडेकरू म्हणून नोटिसा बजावल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात संबंधित नागरिकांनी महापौरांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेने नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत सुमारे आठ हजार घरकुले बांधली आहेत. त्याठिकाणी झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यात आली आहेत. परंतु अनेक ठिकाणी लाभार्थ्यांनी घरे भाड्याने दिली असून, मूळ लाथार्थी पुन्हा झोपडपट्टीत परतले आहेत. यासंदर्भात, महापालिकेच्या वतीने वेळोवेळी शोध मोहिमा राबवल्या जातात. शिवाजीवाडी येथे अशीच मोहीम राबविताना त्याठिकाणी सुमारे सहाशे पैकी सव्वाशे घरांमधील नागरिकांना भाडेकरू ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन कोणालाही येथे कोण राहतात असा प्रश्न करून परस्पर नोटिसा बजावल्या आहेत. रहिवाशांकडून त्याचवेळी कागदपत्रांची मागणी केली असती तर गोंधळ झाला नसता असे लाभार्थींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यापूर्वी असाच गोंधळ झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अतिक्रमण निर्मूलन उपआयुक्त राहुल पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फेरसर्वेक्षण करण्यात येईल, असे सांगितले होते.मात्र, त्यानंतर विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी पुन्हा रहिवाशांना नोटिसा बजावल्या असून तीन दिवसांत घरे रिकामी करा अन्यथा घर जप्त करू अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे या रहिवाशांनी पुन्हा महापौरांकडे धाव घेतली. बुधवारी (दि.२२) महापौर दालनात धारणकर यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांना समज तर दिलीच, परंतु राहुल पाटील यांनीदेखील फेरसर्वेक्षण करण्याचे ठरले असताना पूर्व विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या नोटिसांबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुन्हा फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. यावेळी यशवंत निकुळे, अजिंक्य साने आदी उपस्थित होते. महापालिकेच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेताना लाभार्थींनी दिवसभर मजुरीसाठी गेल्यानंतर अशाप्रकारचे सर्र्वेक्षण केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली. वारंवार सर्वेक्षण करण्यासाठी अशीच वेळ निवडली जाते. वारंवार नोटिसा देण्यापेक्षा पुन्हा झोपडपट्टीत पाठवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेने घरकुलधारकांना बनवले भाडेकरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:41 IST
महापालिकेच्या घरकुल योजनेत लाभार्थींऐवजी भाडेकरू राहत असल्याचा प्रकार उघड करण्यासाठी पूर्व विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत शिवाजीवाडीत लाभार्थींनाच भाडेकरू म्हणून नोटिसा बजावल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात संबंधित नागरिकांनी महापौरांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने घरकुलधारकांना बनवले भाडेकरू!
ठळक मुद्देअजब कारभार : तीन दिवसांत घर खाली करण्याची तंबी; नागरिकांनी घेतली महापौरांकडे धाव