नाशिक : महापालिकेच्या प्रभाग ३५ (ब) आणि प्रभाग ३६ (ब) साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असून पोटनिवडणुकीतील यश ही पुढच्या विजयाची नांदी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने, सेना-भाजपाने पोटनिवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, तर सत्ताधारी मनसे आणि राष्ट्रवादीच्या गोटात मात्र दोलायमान स्थिती आहे. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) या दोन्ही प्रभागातील मनसेचे नगरसेवक यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविल्यानंतर येत्या २८ आॅगस्ट रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ३५ (ब) मध्ये शांताबाई शेजवळ (मनसे), मंदा ढिकले (भाजपा), वृषाली नाठे (शिवसेना) आणि वंदना चाळीसगावकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) तर प्रभाग ३६ (ब) मध्ये प्रवीण पवार (मनसे), सुनंदा मोरे (भाजपा), सुनील शेलार (शिवसेना) आणि शशिकांत उन्हवणे (कॉँग्रेस) हे उमेदवार रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीत कॉँगे्रस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे तर सेना-भाजपा आणि मनसे हे स्वतंत्रपणे लढत आहेत. प्रभाग ३५ मध्ये चारही उमेदवार पहिल्यांंदाच निवडणूक लढत आहे तर प्रभाग ३६ मध्ये यापूर्वी सन २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून सुनील शेलार (७५२ मते) तर कॉँग्रेसकडून शशिकांत उन्हवणे (१०७२) यांनी नशीब अजमावले होते. सन २०१२ च्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार दिले होते. यंदा मात्र आघाडी केल्याने प्रामुख्याने प्रभाग ३६ मध्ये कॉँग्रेसच्या उमेदवाराची ताकद पाहता लाभ उठविला जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, सेना-भाजपाने पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून दोन्ही शहराध्यक्षांनी तेथे तळ ठोकला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील हे दोन्ही प्रभाग असल्याने सानप यांनी दोन्ही जागा भाजपाकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
मनपा पोटनिवडणूक : मनसे, राष्ट्रवादी दोलायमान स्थितीत
By admin | Updated: August 24, 2016 00:38 IST