घोटी : प्रस्तावित मुंबई-घोटी- औरंगाबाद-नागपूर या सुपरफास्ट द्रुतगती महामार्गामुळे इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर सुपीक जमिनी संपादित होणार असल्याने या महामार्गाला तालुक्यातील २२ महसुली गावांतील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. हा महामार्ग तालुक्याला भेदून जात असल्याने शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या जमिनीतून शिल्लक राहिलेल्या जमिनीही यात संपादित होणार असल्याने शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे.इगतपुरी तालुक्यातील जमिनी शासनाने महामार्ग, धरणे, लोहमार्ग, लष्कर आदिंसाठी मोठ्या प्रमाणात संपादित केलेल्या असताना आता प्रस्तावित मुंबई-नागपूर या सहापदरी एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी पुन्हा एकदा राज्य शासन शेकडो हेक्टर जमिनी संपादित करणार आहे. याबाबतचे काम शासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या तालुक्यातील सुमारे २२ महसुली गावांच्या शेतकऱ्यांनी मात्र यास जोरदार विरोध दर्शविला आहे. या पूर्वीच आमच्या पूर्वजांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने हजारो हेक्टर जमिनी ताब्यात घेतल्या. उरल्या सुरल्या अल्पजमिनीही संपादित करण्याचा घाट घातला गेल्यामुळे आम्ही कायमचे भूमिहीन होणार असल्याने आम्ही भूसंपादनास विरोध करत आहोत, असे संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सन १९९४-९५मध्ये तत्कालीन राज्य शासनाच्या काळात या प्रस्तावित प्रकल्पाला तालुकावासीयांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पाचा प्रश्न तेव्हा निकाली निघून त्यातून घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्ग तयार करण्याचे शासनाने त्यावेळी ठरविले. संबंधित रस्त्याच्या कडेच्या व आजूबाजूच्या अनेक जागा अद्यापही पडून असून, मग याच रस्त्याचे शासन नूतनीकरण का करत नाही, असा प्रश्न चर्चिला जात आहे.इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांतून सुमारे ९७ किमी अंतराचा हा एक्स्प्रेस वे जात असून, यापैकी एकट्या इगतपुरी तालुक्यातील जवळपास ५० ते ५५ किमीचे अंतर आहे. (वार्ताहर)
‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे’ला कडाडून विरोध
By admin | Updated: June 29, 2016 00:02 IST