नाशिक - जनतेला गृहित धरून राजकीय सोयीने निवडणुका मॅनेज करण्यासाठी प्रभाग पद्धतीत बदल करायचा आणि पैसा ओतून राजकीय तडजोडी करून सत्ता आणायची, हा काय प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीत चेष्टा सुरू आहे. देशात कुठेही नाही असे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत बदल केवळ महाराष्ट्रातच सुरू असून, देशात हे राज्य वेगळं आहे का, असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अशाप्रकारच्या बेकायदेशीर प्रकाराबद्दल राज्य निवडणूक आयाेगानेच कारवाई करावी तसेच लोकांनीच न्यायालयात जाऊन त्यास विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या १०-१५ वर्षांत एक प्रभाग दोन सदस्यांच प्रभाग, असा प्रकार सुरू आहे. यापूर्वी २०१७ मध्ये निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. राज्य सरकारने तो चुकीचा म्हणून एक सदस्य करण्यासाठी निर्णय घेतला, आता अचानक तीन सदस्यांच प्रभाग घोषित केला. असे का केले, त्याला कोणताही आधार नाही. जर तीन सदस्यांचा एक प्रभाग करायचा होता तर चार सदस्य का रद्द केले, असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी केले. खासदार, आमदार एक इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला एकच उमेदवार निवडून देण्याची पद्धत असताना महापालिका निवडणुकीत तीन उमेदवार का निवडून द्यायचे, असा प्रश्न करीत राज यांनी नागरिकांना तीन नगरसेवकांना कामे सांगताना त्रास होतो, त्याशिवाय त्यांनी तीनवेळा का मतदान करायचे, असा प्रश्न केला. आम्ही या विषयावर बोलू, पण ते राजकीय म्हटले जाईल. मात्र, नागरिकांनी त्यास न्यायालयात जाऊन विरोध केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
इन्फो..
शरियतसारखा कायदा आणा..
राज्यातील महिलांच्या अत्याचारासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे नाहीत. सध्याची ढिसाळ योजनाच त्याला कारणीभूत आहे, असे मत व्यक्त करताना राज ठाकरे यांनी शरियतसारखा कायदा करायला हवा, याचा पुनरुच्चार केला.
इन्फो...
जाणिवपूर्वक ईडीचा घेाळ...
राज्याचे गृहमंत्री ईडीने चौकशीसाठी बोलवल्यावर हजर राहत नाही, तेच यंत्रणेला मानत नसेल तर काय बेालायचे? मुळात हे सर्व नेते बहुधा एकमेकांना फोन करून एकमेकांना सांगूनच ईडीसारखे प्रकरणे करीत असावेत, असे राज यांनी सांगून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हे खेळ सुरू असल्याचे नमूद केले. मुंबई-आग्रा महामार्गाची चाळण झाली असून, खड्ड्यांमध्ये स्पीडब्रेकरदेखील होते, असे उपरोधिकपणे त्यांनी सांगितले.