नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नाशिक शहरातील ५८ परीक्षा केंद्रांवर शनिवारी (दि. ४) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला नाशिक शहर व जिल्हा परिसरातून जवळपास २२,५१५ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असून सुमारे १ हजार ९०० कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ही परीक्षा पार पडणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा - २०२० पुढे ढकलण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या ९ एप्रिल २०२१ च्या पत्रान्वये सूचना प्राप्त झाल्यानंतर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट २०२१ रोजी आयोगाला प्राप्त पत्रातील अभिप्रायानुसार ही परीक्षा शनिवारी (दि. ४) होत सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळी होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९:३० वाजेपासून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी ९ वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, एमपीएससी परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही आयोगातर्फे करण्यात आल्या आहेत.