नाशिक : महाराष्ट्र राज्य तासिका, मानधन शिक्षक स्त्री अधिक्षिका वर्ग-४ कर्मचारी संघटनेचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरूच असून, सोमवारी (दि. २) तीन आंदोलनकर्त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांची संख्या २५ इतकी झाली आहे.दुसरीकडे आदिवासी विकास आयुक्त बाजीराव जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना काल लेखी पत्र देऊन मंगळवारी (दि.३) आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्यासोबत चर्चा करण्याबाबत लेखी कळविले असून, त्यानुसार आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ उद्या सकाळी मुंबईला रवाना होणार आहे. २५ फेब्रुवारीपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर कंत्राटी शिक्षक व कर्मचारी बेमुदत आंदोलनास बसले असून, आंदोलनकर्त्यांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याने दोन डझनहून अधिक आंदोलनकर्त्यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सतीश पावरा व विजय पावरा या दोघांना अस्वस्थता जाणवू लागल्याने १०८ क्रमाकांच्या रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी रविवारी चौघांना, तर त्याआधी १७ आंदोलनकर्त्यांना यापूर्वीच रुग्णालयात दाखल कण्यात आले होते.आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आंदोेलनकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
आंदोलन सुरुच : मंत्रालयात आदिवासी विकासमंत्र्यांशी आज होणार चर्चा
By admin | Updated: March 3, 2015 00:46 IST