नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटले असूनही अद्याप सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. शिवाय विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी सोमवारी (दि.२६) आदिवासी विकास विभागासमोर विद्यार्थ्यांनी आंदोेलन केले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तांना निवेदन दिले. त्यानुसार आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्णातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मुलांची परवड होत आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. ही संख्या वाढत असून, याला वेळीच आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आदिवासी विकास आयुक्तालयासमोर या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर आदिवासी आयुक्तांना मागण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. वसतिगृहातील प्रवेशासह अन्य मागण्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. निवेदनावर संघटनेचे विभागीय अध्यक्ष लकी जाधव, जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, मंगेश लांघे, गौैरव गावित आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आदिवासी विकासला आंदोलन
By admin | Updated: September 27, 2016 00:43 IST