पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलवे कंपनीत दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले आहे.पीएनजी टोल प्रशासनाने शुक्रवारी नवीन ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करत पोलीस बंदोबस्त वाढवून टोलवे सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी सुभाष होळकर, बापू पाटील, सतीश मोरे, अरुण मोरे, दीपक शिंदे तसेच वाहतूक युनियन टेम्पोमालक-चालक संघटनेच्या कर्मचारी वर्गाने पाठिंबा देत टोल वसुली सुरू होऊ दिली नाही. यासंदर्भात टोल प्रशासनाचे राजेश विचारे यांनी याबाबत कुठलीही चर्चा करण्यास नकार देत ताठर भूमिका अवलंबली, परप्रांतीय कर्मचारी वर्गांची टोल प्रशासन नेमणूक करू पाहत असताना, स्थानिक कर्मचारी वर्गांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. जोपर्यंत आहे त्याच कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेत नाही, तोपर्यंत कुठल्याही परीस्थितीत टोल चालू न देण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला आहे. आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहनाचा इशारा सुधीर डांगळे, संपत फडाळे, राजेश चौधरी, अतुल गायकवाड, सुवर्णा बोरसे, मीनाक्षी गांगुर्डे, नवनाथ पवार, गोरख मोगरे आदिंनी दिला आहे. कर्मचारी वर्गाला स्थानिक भास्करराव बनकर, दिलीपराव बनकर, सतीश मोरे, किरण लभडे, दीपक शिंदे, संजू मोरे, सुभाष होळकर, बाळासाहेब आंबेडकर, विजय भंडारे आदिंनी पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
पिंपळगाव टोलनाक्यावर आंदोलन सुरूच
By admin | Updated: May 17, 2015 23:53 IST