लोहोणेर : नासिक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समाजजागृतीसाठी देवळा तालुक्यातील लोहोणेर जिल्हा परिषद गटातून बुधवारी (दि. २१) मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या मोटारसायकल रॅलीने संपूर्ण लोहोणेर गटात चैत्यन्य निर्माण झाले आहे. भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा असा प्रवास करून रॅली लोहोणेर येथे पोहचली व येथून खालप येथे रवाना झाली. मोटारसायकल रॅलीला देवळा येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरापासून जनाबाई अहेर यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. आजच्या मोटारसायकल समाजजागृती रॅलीत ४०० ते ५०० मोटारसायकलींच्या ताफ्याने संपूर्ण तालुका पिंजून काढला. या रॅलीत युवकांचा सहभाग महत्त्वाचा होता. देवळा येथून निघालेल्या रॅलीच्या प्रारंभी उरी येथील पाकिस्तानी दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी देवळा बाजार समितीचे माजी सभापती योगेश अहेर, नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र अहेर, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत अहेर, युवा नेते संभाजी अहेर, खुंटेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पगार, शिवराजे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण अहेर, शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक अहेर, काकाजी अहेर, राजेंद्र देवरे, सतीश सूर्यवंशी, विजू शिंदे, नगरसेवक बाळासाहेब अहेर, दिलीप अहेर, छावाचे जिल्हाध्यक्ष भरत अहिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
लोहोणेर गटात मोटारसायकल रॅली
By admin | Updated: September 22, 2016 00:34 IST