‘कमको’ बँकेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच बँकेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात ९७व्या घटना दुरुस्ती व आदर्श पोटनियमानुसार नागरी सहकारी बँकेस तक्रार निवारण व तडजोड समिती नियुक्त करणे बंधनकारक असल्यामुळे समिती गठित करण्यात येऊन समितीच्या अध्यक्षपदी बँकेचे सभासद मोतीराम अर्जुन पगार यांची निवड संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.
पगार हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख, श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष असून, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम बघत आहे. कमकोचे सभासद आणि बँक यांच्यामध्ये वेळोवेळी निर्माण होणारे वाद, कर्जदार व ठेवीदार यांच्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी तसेच बँकेचे थकबाकीदार आणि बँक यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी व तडजोड करण्यासाठी तक्रार निवारण व तडजोड समिती स्थापन करण्यात आली आहे. पगार यांच्या नियुक्तीबद्दल विविध संस्था व संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. (३० मोतीराम पगार)