नातेवाइकांच्या गर्दीची समस्या
नाशिक : अनेक शासकीय आणि खासगी रुग्णालयांबाहेर त्या रुग्णांचे नातेवाईक, कुटुंबीय डबा देण्यासाठी किंवा रुग्णाला मानसिक आधार वाटावा म्हणून रुग्णालयांबाहेर ठाण मांडून बसतात. तर काही नागरिक परगावातील असल्याने त्यांना अन्यत्र कुठे थांबणेदेखील शक्य हाेत नसल्याने अशा बाधितांच्या कुटुंबीयांची रुग्णालयाबाहेर गर्दी होते. मात्र कोरोनाकाळात ही अजून एक समस्या झाली आहे.
दुभाजकांतील झाडे सुकली
नाशिक : पंचवटी भागातील रस्त्यावरील विविध दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी आकर्षक फुलांची लागवड करण्यात आली होती. परंतु, देखभालीअभावी या सुशोभीकरणाची दुरवस्था झाली आहे. दुभाजकावर ठिकठिकाणी रानगवत उगवले असून, पाण्याअभावी झाडे सुकली आहेत. त्याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने दुभाजक पुन्हा भकास बनले आहेत.
उद्यानांमध्ये वाढले गवत
नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उद्यानांमधील गवत काढून उद्याने पुन्हा सुशोभित करावीत; तसेच परिसरात धूरफवारणी करून डासांचा उपद्रव कमी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
नाशिक : शहरातील सातपूर भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरांच्या झुंडी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे कधी कधी तर नागरिकांचे अपघातदेखील होतात.
थुंकणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई
नाशिक : कोरोनाचे थैमान सुरू असताना रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या मास्क न लावल्यास कारवाई होते. मात्र, मास्क बाजूला सारून रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्या नागरिकांना दंड झाल्याचे दिसत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.