नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारणे आणि दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी (दि. ११) शहरातील साहित्य, कला तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अर्जांची खरेदी करून या निवडणुकीत तिसरे पॅनल निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत.शनिवार अखेरीस सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठीदेखील अध्यक्षपदाच्या अर्जाची खरेदी केली असून, उपाध्यक्षपदासाठी किशोर पाठक, रमेश जुन्नरे आणि कांतिलाल कोठारे यांनी अर्जाची खरेदी केली आहे, तर कार्यकारिणी मंडळासाठी २८ अर्जांची विक्री झाली आहे. शनिवारी कार्यकारिणी मंडळासाठी रमेश जुन्नरे, वेदश्री थिगळे, श्रीकांत बेणी, नंदन रहाणे, अभिजीत बगदे, जयप्रकाश जातेगावकर, शारदा गायकवाड, संजय करंजकर, समीर शेटे यांच्यासह कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांचा समावेश असलेल्या ‘जनस्थान’ या व्हाट््स अॅप ग्रुपचे सदस्य विनोद राठोेड, मोहन उपासनी, प्रशांत केंदळे, संजय गिते आदिंनी कार्यकारिणी मंडळपदासाठी अर्जांची खरेदी करून या निवडणुकीसाठी वेगळे पॅनल निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. जनस्थान ग्रुपच्या सदस्यांनी अर्जाची खरेदी केलेली असली तरी रविवारी (दि. १२) सदस्य एकत्र येत बैठकीतून या निवडणुकीची पुढची दिशा ठरवणार असल्याचे ग्रुपमधील एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीमुळे साहित्य क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. वाचनालयाच्या विद्यमान कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आलेले कार्यवाह आपले स्वतंत्र पॅनल निर्माण करण्याची चर्चा होती, परंतु यंदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे मिलिंद जहागिरदार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले तसेच प्रा. विलास औरंगाबादकर आणि श्रीकांत बेणी यांनी आपापले स्वतंत्र पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचे सांगताना पुढील काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.वैध उमेदवारांची यादी शुक्रवार (दि. १७) तर उमेदवारांची माघारीनंतरची यादी सोमवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी अर्ज खरेदी आणि दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. (प्रतिनिधी)
सावानात दोनपेक्षा अधिक पॅनलची निर्मिती?
By admin | Updated: March 12, 2017 01:16 IST