नाशिक : शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिन, एकादशी, १७ रोजी पतेती, १८ रोजी रक्षाबंधन अशा सलग सुट्या आल्याने बाहेरगावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशासांठी एसटी महामंंडळाच्या नाशिक आगाराकडून तसेच जिल्ह्णातील इतर आगारांकडून मुबलक प्रमाणात बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक मगन भामरे यांनी दिली.यात पुणे, धुळे, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर यांसह इतर ठिकाणांना जाणाऱ्या व येणाऱ्या बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस सुरूही झाल्या असून इतर बसेस १३ आॅगस्टपासून सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीच्या कालावधीमध्ये कसारा, कळवण, शिर्डी, मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला, नगरसूल, जळगाव, मुंबई अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेस सोडण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या बसेस या प्रवाशांच्या संख्येनुसार वाढविण्यात येणार आहे. सलग सुट्यांमुळे त्र्यंबकला प्रवाशांची संख्या वाढू शकते.ही गोष्ट लक्षात घेऊन बसचे नियोजन केले जाणार आहे. औरंगाबादला जाण्यासाठी १ आॅगस्टपासून दर अर्ध्या तासाला विनावाहक बसेस सोडण्यात येत आहे. नवीन सीबीएस व नांदूरनाका येथे तिकीट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली असून या बससाठी नाशिकहून निघाल्यानंतर वैजापूर येथे एकच थांबा असणार आहे. औरंगाबादहून येतानाही येवला या ठिकाणी या बसचा थांबा असणार आहे. नाशिक-धुळे या मार्गावरही विनावाहक बससेवा सुरू करण्यात आली असून त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. (प्रतिनिधी)
सलग सुट्यांसाठी जादा बसेसचे नियोजन
By admin | Updated: August 13, 2016 00:02 IST