नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. भाजपाकडून पहिल्याच मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने या निमित्ताने महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळदेेखील फोडला जाणार आहे.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने मोठ्या साेहळ्याची गरज असल्याने १ जुलैस घाईघाईने बस सुरू न करता आता वाजतगाजत समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल यांच्याशी संपर्क साधून महापौरांनी त्यांनाही निमंत्रित केले आहे.
महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे, तसेच प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने यांनी शनिवारी (दि.३) मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या उपस्थितीत बस सेवेचा शुभारंभ करण्याचे निश्चित केले. यावेळी भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
तब्बल सहा वेळा फेटाळलेला शहर बस सेवेचा प्रस्ताव २०१८ मध्ये नाशिक महापालिकेने स्वीकारला. शहरात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेताना राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने हा निर्णय झाला. त्यानंतर हायटेक बस, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुविधा, आयटीएमएस सुविधा तसेच पर्यावरण स्नेही इंधन असे या बस सेवेचे स्वरूप आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने बस सेवा १ ते १० जुलैस सुरू करण्याचे ठरवल्यानंतर याच आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष बस रस्त्यावर आणून चाचणी केली हेाती. सुरुवातीला पन्नास मिडी डिझेल बस सुरू करण्यात येणार आहेत. पंचवटी येथील तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोतून या बस धावतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढवण्यात येणार आहे.
इन्फो...
शहर बस सेवेच्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ९० टक्के काम पूर्ण होत आले असून तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास बस नऊ मार्गांवर धावणार असून, त्यात २४० बस थांबे असणार आहेत.
इन्फो..
या नऊ मार्गांवरून धावणार बस
१) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हिल, सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर
२) तपोवन सिंबाॅयसिस कॉलेज मार्गे पवननगर, उत्तमनगर
३)तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव
४)सिंबाॅयसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखानगर महामार्ग, मसरूळ, बोरगड
५)तपोवन ते भगूर मार्गे शालीमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प
६)नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी कार्बन नाका
७)नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका महामार्ग, लेखानगर, गरवारे
८)नाशिक रोड ते निमाणी मार्गे जेल टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन
९)नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालीमार, सीबीएस, पंचवटी
----------
छायाचित्र आर फोटोवर ०३ एनएमसी बस
030721\03nsk_38_03072021_13.jpg
नाशिक महापालिकेच्या सीटी लिंक बससेेवेच्या शुभारंभासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत बाळासाहेब सानप, विजय सानप, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, गणेश गिते व ॲड. राहुल ढिकले.