संजय शहाणे इंदिरानगर पक्षातील संघटनात्मक फेरबदलानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांचे नाराजी नाट्य गेल्यावेळी गाजले असताना आता त्या रांगेत एका नगरसेवकाची भर पडली आहे. इंदिरानगर येथील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी नाराजीतून पक्ष आणि पक्षनेत्यांचे बॅनर उतरविले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या झाडाझडतीत सोनवणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते व्यथित असल्याचे वृत्त आहे.युनिक गु्रप आॅफ इंदिरानगरच्या माध्यमातून काम करणाऱ्या सतीश सोनवणे यांनी विविध उपक्रम राबविले. त्यातून त्यांना प्रभाग क्रमांक ५३ गेल्या मनपा निवडणुकीत मनसेची उमेदवारी मिळाली. ते निवडून आल्यानंतरही त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरू ठेवले. त्यानंतर आधी पूर्व प्रभाग सभापतिपदासाठी नंतर माघार घेण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर आता दोनच महिन्यांपूर्वी स्थायी समिती सदस्यपदासाठी त्यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते. तसेच पुन्हा नेत्यांनी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. या घडामोडींमुळे सोनवणे यांनी पक्ष बैठकांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता तर त्यांनी भगवती चौकासह विविध ठिकाणी पक्षनेत्यांबरोबर असलेल्या आपल्या छबी काढून घेण्यास सुरुवात केली असून, त्या जागी केवळ युनिक ग्रुपचे फलक लावले जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.यासंदर्भात सोनवणे काहीही कारण देत असले तरी दीड महिन्यापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी सोनवणे यांना राष्ट्रवादीतील काही व्यक्तींचे संबंध तसेच गुन्हेगारांशी कथित संबंध या विषयावरून तासले होते. लोकसभा निवडणुकीत आपण निष्ठेने काम केल्याचे सोनवणे यांचे म्हणणे होते. हेच कारण सोनवणे यांच्या नाराजीमागे असल्याचे सांगितले जात आहे.
मनसेत नाराजी सत्र सुरूच
By admin | Updated: July 21, 2014 01:06 IST