नाशिक : पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सेना-भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची पुरती कोंडी करण्याची रणनीती मनसेकडून आखली जात असून त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात उमेदवारी करण्याच्या दृष्टीने इच्छुकांनी आपली तयारी आरंभली असून, काही दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. आतापर्यंत त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसला आहे. मनसेचे माजी महापौर अॅड. यतिन वाघ, अरविंंद शेळके, रमेश धोंगडे व रत्नमाला राणे यांनी शिवसेनेत, तर डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव आणि अर्चना थोरात यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. नाशिकरोड येथील मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांनी पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरविले आहे. आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी सहाही विभागांत निवडणुका आटोपल्यानंतर पुन्हा एकदा बंडखोरीचे पेव फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाही फटका मनसेला बसण्याचे संकेत मिळत आहेत. आता कुठल्याही समितीच्या निवडणुका नसल्याने पक्षाला व्हिप बजावता येणार नाही. त्यामुळे मनसेने बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांची त्यांच्या प्रभागात पुरती कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. संबंधित बंडखोर नगरसेवकांच्या कामांच्या फाईली प्रलंबित ठेवण्यात येणार असल्याची चर्चा असून, प्रत्येक पातळीवर त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाशी गद्दारी केल्याच्या भावनेने आता पक्षाकडून कठोर पावले उचलली जाण्याचीही सूतोवाच एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केले आहे. प्रामुख्याने पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यासंदर्भात काही पदाधिकारी आग्रही आहेत. दरम्यान, बंडखोर नगरसेवकांचा पक्षातून आता पत्ता कट होणार असल्याने त्या-त्या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मनसेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी काही इच्छुक आतापासूनच सक्रिय झाले आहेत. त्याचा प्रत्यय गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव यातून आला. (प्रतिनिधी)
मनसे करणार बंडखोरांची कोंडी
By admin | Updated: April 15, 2016 00:24 IST