नाशिक : महापालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. कशाबशा पाच जागा मनसेच्या पदरात पडल्या. सत्तापद गमावल्यानंतर त्याचे पडसाद गुरुवारी (दि.९) मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनावरही उमटले आणि केवळ नाशिकरोडला मिठाईचे वाटप वगळता अन्यत्र निरुत्साह दिसून आला. प्रमुख पदाधिकारी मात्र मुंबईला राज ठाकरे यांच्या भाषणासाठी रवाना झाले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरुवारी अकरावा वर्धापनदिन होता. आजवर वर्धापनदिनी काही ना काही उपक्रमांचे आयोजन शहरात होत होते. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत मनसे सत्तास्थानी होती. त्यामुळे वर्धापनदिनी होणाऱ्या कार्यक्रमातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून यायचा. मात्र, गेल्या पाच वर्षांत मनसेच्या ४० नगरसेवकांची संख्या १० वर आली. ३० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. गेल्या महापालिका निवडणुकीत १२२ जागा लढविणाऱ्या मनसेने यंदा ९७ जागा लढविल्या. त्यात ७ विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा उमेदवारी केली. त्यातील महापौरांसह तिघांनाच पुन्हा महापालिकेत निवडून जाण्याची संधी जनतेने दिली. ९७ पैकी मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. मनसेला निवडणुकीत जबरदस्त फटका बसला. निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अजून मनसे पुरती सावरलेली नसतानाच मनसेचा अकराव्या वर्धापन दिनावरही पराभवाचे सावट दिसून आले. पक्षाच्या राजगड कार्यालयाकडे फारसे कुणी फिरकले नाहीत तर पक्षाचा अधिकृत असा कुठे कार्यक्रमही झाला नाही. केवळ नाशिकरोड विभागीय कार्यकारिणीने बिटको चौकात काही किलो मिठाई वाटपाचा कार्यक्रम करत औपचारिकता साधली. इतरत्र कुठेही कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मात्र मुंबईला होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी रवाना झाल्याची माहिती पक्षकार्यालयातून देण्यात आली. (प्रतिनिधी)
नाशकात मनसेचा वर्धापनदिन ‘कोरडा’
By admin | Updated: March 10, 2017 01:43 IST