नाशिक : मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे अपूर्ण असून, त्या बाबत आपण समाधानी नाही़ उर्वरित संपूर्ण आरक्षणासाठी शिवसंग्रामचा लढा कायम चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार विनायक मेटे यांनी येथे केले़रावसाहेब थोरात सभागृहात शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते़ याप्रसंगी मेटे तसेच खासदार हेमंत गोडसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला़मेटे म्हणाले, राज्य शासनाने ५२ टक्के मुख्य आरक्षण वगळून उर्वरित ४८ टक्क्यातून मराठा समाजाला १६ व मुस्लीम समाजाला ५ असे २१ टक्के आरक्षण दिले आहे़ परंतु वास्तवात मराठा आरक्षण हे ८ टक्केच मिळत आहे़ किमान १६ टक्के आरक्षण आम्हाला पूर्णपणे मिळालेच पाहिजे़ आरक्षणाच्या अध्यादेशात ही मेख राज्य शासनाने मारली आहे़ तसेच राज्यपालांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशन होणे आवश्यक आहे जे आता होणार नाही़ शासनाने केवळ नाईलाजाने आणि लोकसभेतील पराभव पाहून खुर्च्या वाचविण्यासाठी हे आरक्षण दिले आहे़ याचा लाभ राज्यापुरता मर्यादित आहे़ वास्तविक केंद्रात दुप्पट सुविधा तसेच संधी आहेत़ यामुळे राज्यात तसेच देशभरात पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे़, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, नगरसेवक विलास शिंदे, केशव पोरजे, दिलीप दातीर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, डॉ़ उदय अहेर, जिल्हाध्यक्ष शिवाजी भागवत, शेखर देवरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)